Avinash Rachmale

AvinashRachmaleअविनाश रचमाले
शब्दांकन – संजय मेहेंदळे

पन्नास वर्षांपूर्वीचा काळ; ‘वायगाव’ लातूर जिल्हयातलं एक छोटंसं गाव; पाण्याची, केरोसीनची कायम टंचाई; शेतीशिवाय उपजीविकेचं दुसरं साधन नाही; रूढार्थानं ‘उच्च शिक्षणाची’ कोणतीही पार्श्वभूमी नाही; अशी सभोवतालची परिस्थिती असतांना, अविनाश रचमाले यांनी अटकेपारच नाही; तर सातासमुद्रापार जो काही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे त्याला तोड नाही.
गावाकडे सातवीपर्यंतचे शिक्षण केल्यावर, पुढील शिक्षणासाठी अविनाश आपल्या वडील बंधूंकडे औरंगाबादला आले. पाच भावंडांत अविनाश सर्वात धाकटे. या पाचही भावंडांनी, प्रतिकूल परिस्थितीतही, अंगभूत हुशारीला कठोर परिश्रमाची जोड देऊन; वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रात आज आपापले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पण त्या कठीण दिवसांची आठवण सांगतांना अविनाश म्हणाले, “गावाकडून आलेल्या धान्याच्या बदल्यात मिळणाऱ्या गोष्टींवर कधीकधी आमची गुजराण चालत असे”. एस. टी. स्टँडवर गावाकडून आलेलं धान्याचं पोतं सायकलवरून नेतांना एकदा ते सांडल्याचं अविनाश अजूनही विसरलेले नाहीत.

औरंगाबाद येथील इंजिनिअरींग कॉलेजातून B.E. (Civil) पूर्ण केल्यानंतर अविनाश यांनी काही काळ मुंबईत नोकरीही केली. एके दिवशी वडील बंधूंच्या आग्रहाखातर त्यांच्या अमेरिकेहून आलेल्या एका मित्रास भेटावयास गेले….. आणि ही भेट अविनाश यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्या मित्रांकडून अमेरिकेत मिळणारी संधी, सुविधा, आव्हाने यांच्या जोरावर आपले भवितव्य आपणच कसे घडवू शकतो याविषयी सल्ला, मार्गदर्शन मिळाल्यावर अमेरिकेत येण्याचा पक्का निश्चय अविनाश यांनी केला आणि….. the rest is history.

एकदा अमेरिकेला यायचे नक्की ठरवल्यावर GRE, TOEFL परीक्षा देऊन डेट्रॉईटच्या ‘Wayne State’ युनिव्हर्सिटी मध्ये MS करण्यासाठी प्रवेश घेतला. त्याच युनिव्हर्सिटीच्या ‘Hall of Fame’ मध्ये आज अविनाश यांचं नाव कोरलेलं आहे. भारतात असतांनाच इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर लगेचच व्यवसायात शिरण्याचा अविनाश यांचा मानस होता व तो त्यांनी आपल्या वडील बंधूंना बोलूनही दाखवला होता. ‘You are a fool’ हे वडील बंधूंचे त्या वेळेचे उद्गार अविनाश यांना आजही आठवतात. ‘आधी नोकरी कर. अनुभव गाठीशी बांध आणि मगच व्यवसायात उडी घे.’ या त्यांच्या सांगण्यानुसार MS झाल्यावरदेखील अविनाश यांनी ‘TYJT’ कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. कामातला पुरेसा अनुभव गाठीशी गोळा झाल्यावर व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा सर्वांगीण अनुभव गोळा करण्याच्या उद्देशाने ‘Espinoza Consultant’ नामक एका छोट्याशा कंपनीत ‘ऑपरेशन मॅनेजर’ म्हणून नोकरी स्वीकारली. अविनाश सांगत होते, “I was the only employee’; पण अवघ्या दोन-अडीच वर्षात वीसहून अधिक लोक कंपनीत कामावर घेऊन कंपनीची वार्षिक उलाढाल ५ दशलक्ष डॉलर पर्यंत पोचवली. अशा प्रकारे आपण व्यवसाय नक्कीच उत्तम प्रकारे चालवू शकतो याची खात्री पटल्यावर १९९४ साली स्वतःची ‘Lakeshore Engineering’ कंपनी काढायचा निर्णय पक्का केला.

सुरूवातीला कंपनीचं कार्यक्षेत्र म्हणून Water, Soil Contamination Inspection and Treatment यांची निवड केली. कामासाठी लागणारी सर्वच यंत्रसामुग्री सुरुवातीला विकत घेणं अर्थातच अशक्य होतं…. पण ‘इच्छा असेल तेथे मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे ड्रिल मशिन विकत घेतलं, लागणारा ट्रक लीजने घेतला….. पण प्रत्यक्ष काम, ‘साईट’चा अजून पत्ता नव्हता…. मग काय करायचं??? कमीतकमी खोदकामाचा तरी अनुभव असावा म्हणून स्वतःच्या राहत्या घराच्या drive-way मधेच ड्रिलिंग करून कामाचा श्रीगणेशा केला. हळू हळू कामं मिळत गेली कंपनीची भरभराट होत गेली तशीच कामाची व्याप्तीसुद्धा वाढत गेली. Diversified Portfolio म्हणावा तसं ‘construction’ च्या वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनीने भक्कम पाय रोवायला सुरवात केली. २००५ साली US Air Force बरोबर करार करून जगभरातल्या US Air bases साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांची काम घेण्यास सुरवात केली.

त्यानंतर कंपनीचा आलेख सतत उंचावतच गेला…. Fastest Growing Company, २००९ साली प्रेसिडेंट ऍवॉर्ड व त्यासाठी White House मधे खास निमंत्रण, ४० हुन अधिक ऑफिसेस, ६५० हुन अधिक स्टाफ…. Rebuilding Iraq या कामाविषयी बोलतांना अविनाश म्हणाले, “कामाचं सुरुवातीचं अंदाजपत्रक ६ मिलियन डॉलरचं होतं, पण आम्ही काम वेळेत तर केलंच, कमी किंमतीतही करून दाखवलं आणि उरलेले ३ मिलियन डॉलर अमेरिकन सरकारला परत केले. यामुळे आमची वेगळी प्रतिमा तयार होण्यास नक्कीच मदत झाली”. यानंतर मग कुवेत असो, पाकिस्तान असो, कतार असो, हैती असो, कामांचा ओघ चालू झाला. “१५ बिलियन डॉलरचे एकूण प्रॉजेक्ट्स होते”…. अविनाश सांगत होते. आता ‘मिलियन’ हाच आकडा मुळात फक्त Lotto च्या जाहिरातींत ऐकलेला, वाचलेला; त्यामुळे मी आपला ‘१५ बिलियन, म्हणजे पंधराच्या पुढे किती शून्य’ चा हिशोब मनाशी जुळवत बसलेला…. “Billion… Million नाही” या अविनाश यांच्या उद्गाराने भानावर आलो…..

“आम्ही काही ‘Rocket Science’ मध्ये काम करत नाही; पण जे काही करायचं ते सचोटीने करायचं, व्यवसायात दिला शब्द पाळायचा, ‘Customer Satisfaction’ सर्वात महत्वाचं…. लोकांनां कामावर घेतांना त्यांच्याकडे अनुभव, तांत्रिक शिक्षण कमी असेल तरी एकवेळ मला चालतं; पण जबाबदारीची जाण, झोकून देऊन काम करायची प्रवृत्ती, कामाविषयी एकंदरीतच Positive Attitude अशा गोष्टी मी आवर्जून बघतो…..” कंपनीच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा मागोवा घेतांना अविनाश सांगत होते.

ज्या डेट्रॉईट शहराने आपल्याला उच्च शिक्षण, व्यवसायाची संधी आणि भरभराट दिली त्या शहराविषयी “Detroit First” अशी आपलेपणाची भावना बाळगून डेट्रॉईटच्या पाचशेहून अधिक भूमिपुत्रांना आपल्या कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याचा सार्थ अभिमान आणि समाधान अविनाश यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
डेट्रॉईटच्या महाराष्ट्र मंडळासाठी तर अविनाश आणि हेमाताई रचमाले यांचं घर, ऑफिस म्हणजे अगदी हक्काची ठिकाणं आहेत. मंडळाच्या महत्वाच्या मिटींग्स असोत, भारतातून आलेल्या कलाकारांची उतरायची सोय करायची असो, अगदी आत्ताच्या BMM साठीच्या ‘उद्घाटन सोहळ्याच्या रंगीत तालमी असो…. या दोन्ही ठिकाणचे दरवाजे कायम उघडे असतात. BMM वरून एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे शिकागो येथील २०१३ च्या अधिवेशनात, काहीतरी कारणांमुळे ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमात वेळेचे नियोजन कोलमडले, व संयोजकांना आर्थिक फटका बसायची लक्षणं दिसत होती. अशा वेळेस स्टेजवर तिथल्या तिथे, आयत्या वेळेला अविनाश यांनी BMM साठी दहा हजार डॉलरची देणगी आर्थिक मदत म्हणून देऊ केली. याशिवाय Hindu Temple of Canton, Wayne State University, NAACP, Rosa Parks Geriatric DMC, Bhartiya Temple of Troy या व अशा अनेक संस्थांना, मंदिरांना सढळ हस्ते देणग्या दिल्या आहेत. बरं या सर्व देणग्यांचा कोठेही गवगवा नाही, पुढेपुढे नाही, स्टेजवर जाण्याची इच्छा नाही…. ‘देणगी देऊन झाली, आपलं काम संपलं’, इतका सोपा हिशोब करून हा माणूस बाजूला होतो.

नाव, यश, पैसा…. खूप काही कमवूनसुद्धा साधा राहिलेला हा माणूस डेट्रॉईटकरांसाठी भूषण आहे. BMM येतील जातील; पण स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या मराठी लोकांच्या यादीत अविनाश रचमाले यांचे नाव नेहमीच अग्रणी राहील.