ePrasaran TeamAtul Vaidya (ePrasaran)

आजकालच्या रेडिओ मिर्चीच्या जमान्यातील लोकांना कदाचित ePrasaran च्या इंटरनेट रेडिओचं फारसं कौतुक वाटणार नाही. पण ज्यांनी रेडिओवर विविधभारती, सिलोन, ऑल इंडिया रेडिओ अशी स्टेशन्स लावण्यात व त्यावर बिनाका, आपली आवड असे अनेकविध कार्यक्रम ऐकण्यात तासनतास घालवलेत त्यांना या इंटरनेट रेडिओनं जुन्या दिवसांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद नक्कीच होईल. दुरचित्रवाणी, अर्थात TV, च्या अवाढव्य पसरलेल्या साम्राज्याअगोदर दुरवाणी, अर्थात रेडिओचंच युग होतं. अगदी त्या मोठ्ठया खोक्याएवढ्या रेडिओपासून ते हातात मावणाऱ्या ट्रान्झिस्टरपर्यंत, श्रीमंतापासून ते गरिबांपर्यंत, सर्वांच्या सेवेला, सर्वांच्या आवडी वेळी-अवेळी पुरवायला, सिनेसंगीत, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भजनं, बातम्या, क्रिकेटचं धावतं समालोचन, विविध श्रुतिका अशा अनेक कार्यक्रमांच्या मनोरंजनाचा खजिना म्हणजे रेडिओ….

पन्नाशीच्या दशकात किंवा त्यासुमारास भारतातून अमेरिकेत आलेल्यांची गोष्टच वेगळी…. ते तर पूर्णतः भिन्न देशातच आले होते. अन्न, वस्त्र, निवारा, भाषा-परिभाषा, चालीरिती, करमणुकीची साधनं, संकल्पना सारंच काही निराळं होतं. त्यामानाने ऐंशीच्या दशकापासून पदव्युत्तर अभ्यासासाठी म्हणून; किंवा नव्वदीच्या दशकात नोकरीनिमित्त अमेरिकेत येणाऱ्या मराठी लोकांचा ओघ जसजसा वाढत चालला तसतसा हा फरक कमीकमी होत चालला. अमेरिकेत आता भारतीय वस्तूंची, किराणा सामानाची दुकानं, उत्तर अथवा दाक्षीणात्य पद्धतीची उपाहारगृहं दिसू लागली होती. तरी पण करमणुकीच्या साधनांसाठी अजून, म्हणजे जेंव्हा VCR आणि TAPES वापरत होते त्या दिवसांबद्दल बोलतोय, भारतातून आणलेल्या CD, Tapes इत्यादी साधनांवरच अवलंबून राहावे लागत असे. इंटरनेट अजून नळासारखे धो-धो चालू झालेले नव्हते. त्या दिवसांत बऱ्याच लोकांना रेडिओची उणीव जाणवत होती. “गरज ही शोधाची जननी असते” म्हणतात त्याप्रमाणे ही उणीव व त्यामुळे येणारी चुकल्याचुकल्या ची भावना याचं संधीत रूपांतर करून नवीन काहीतरी करायच्या ध्यासाने प्रेरित होऊन दहा वर्षांपूर्वी अतुल वैद्य व मिलिंद गोखले या मित्रद्वयीने त्यांच्या सुविद्य पत्नी विद्या वैद्य आणि मधुरा गोखले यांच्या सहकार्याने http://eprasaran.com/ या संकेतस्थळाची मुहूर्तमेढ रोवली. “मराठी माणसांनी सुरु केलेलं, मराठी माणसांसाठी चालवलेलं, मराठी कार्यक्रमांना वाहिलेलं” असं हे कदाचित एकमेव संकेतस्थळ असेल. रेडिओचा जमाना नव्याने, आधुनिक स्वरूपात सुरु तर करायचा; पण नक्की कसा करायचा, उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम कसे मिळवायचे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते कसे पोहचवायचे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोपी नव्हती. पण या अडचणींवर मात करून गेली दहा वर्ष अव्याहतपणे, दर आठवड्यास नवीन कार्यक्रम सादर करीत आहेत.

अतुल वैद्य मूळचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, ऑडिओ-व्हिडीओ च्या तंत्रज्ञानात प्रचंड अनुभव मिळवलेले; मिलिंद गोखले प्रोग्रामिंग मधील तज्ञ; सौ. वैद्य आणि गोखले कसलेल्या अभिनेत्री व कार्यक्रमाचे सूत्र संचालनाचा भरपूर अनुभव गाठीशी असलेल्या; अर्थार्जनाची अजिबात अपेक्षा न ठेवता; छंद, हौस म्हणून…. पैसा व त्याहुन अधिक महत्वाचं म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करून अतिशय तन्मयतेने नवनवीन कार्यक्रम ePrasaran द्वारा सादर करत असतात. आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक तर महिनाभर अगोदर तयार असते. “एक तासाचा कार्यक्रम तयार करायला चार-पाच ताससुद्धा लागतात” वैद्य सांगत होते…. हे कार्यक्रम म्हणजे नुसतीच गाणी नसतात…. तर काहीतरी थीम घेऊन त्यानुसार गाण्यांची निवड करून त्या सर्व गाण्यांना गुंफणारं निवेदन या सर्वांचं एकत्रित सादरीकरण असतं. दर आठवड्याला चार मराठी व चार हिंदी, प्रत्येकी साधारण एकेक तासाचे, असे आठ कार्यक्रम प्रसारित होतात. करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरच माहिती व प्रबोधनपर कार्यक्रमसुद्धा सादर केले जातात. “आयुर्वेद आणि उपचार” यांवर आधारित सुमारे पंधरा मुलाखतींचा यानिमित्ताने आवर्जून उल्लेख करावा लागेल. रसिकांच्या आग्रहाखातर या मुलाखतींचे वारंवार प्रसारण सुद्धा करावे लागले….. वैद्य सांगत होते. आतापर्यंतच्या बऱ्याच कार्यक्रमांचे, मुलाखतींचे ध्वनीमुद्रणसुद्धा आवर्जून जपून ठेवण्यात आले आहे. काही “हटके” कार्यक्रमांपैकी, इतरांची मुलाखत घेणाऱ्या सुधीर गाडगीळ यांची मुलाखत ePrasaran वर प्रसारित करण्यात आली होती. येथे केवळ सुप्रसिद्धांनाच नाही तर अप्रसिद्धांना सुद्धा आवर्जून संधी मिळते. आपली आवड / आपकी पसंद या कार्यक्रमांत, श्रोत्यांच्या फर्माइशींची गाणी ऐकवण्यासाठी, ती मिळवण्यासाठी; ही मंडळी जीवाचे रान करतात. त्यांच्या या छंदावरील प्रेमामुळे अनेक लोकंसुद्धा त्यांना काही जुनी, दुर्मिळ गाणी, रेकॉर्डिंग्जस उपलब्ध करून देण्यास आपणहून मदत करतात. याच संकेतस्थळावरून प्रसारित होत असलेला “गीतांजली” हा कार्यक्रम डेट्रॉईटचे डॉ. सुभाष केळकर सादर करत असतात.

याच टीमने

-प्रसारण च्या व्यतिरिक्त “स्वरांगण”, “नाट्यदर्पण” इत्यादी स्पर्धापण यशस्वीरीत्या आयोजित केल्या. “स्वरांगण” च्या स्पर्धेची अंतिम पायरी शिकागो येथील BMM मधे रसिकांनी डोक्यावर घेतली होती.

नव्या तंत्रज्ञानाच्या क्लाउड कॉम्पुटिंग च्या सहाय्याने आज ePrasaran अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. आजच्या घडीला जगभरातील १६० हुन अधिक देशांतल्या ६०० हुन अधिक गावांतून २५ लाखांहून अधिक श्रोते या इंटरनेट रेडिओ च्या प्रसारण सेवेचा लाभ घेत आहेत.

या वर्षी ePrasaran चालू झाल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मायमराठी च्या कार्यक्रमांची पताका पाचही खंडांत यापुढेही अशीच डौलाने फडकत ठेवायचा निर्धारच या इंटरनेट रेडिओ विषयी बोलतांना अतुल यांच्या बोलण्यात दिसत होता. सतत दहा वर्ष अखंडित दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याच्या ध्यासाला, जिद्दीला, चिकाटीला मनोमन नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला.

शब्दांकन – संजय मेहेंदळे